काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यातर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा गौरव समारंभ शुक्रवारी (ता. २५ एप्रिल २०२५) कराड येथे संपन्न झाला.
कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते महेंद्रशेठ घरत यांना मानपत्र, संविधानाची प्रत, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आजच्या काळात समाजासाठी खर्च करणारे कमी झालेत, पण महेंद्रशेठ सतत सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात मदत करत असल्याने त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.“
महेंद्रशेठ घरत यांनी पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी कराडजवळ कृष्णा-कोयनेच्या संगमावर वसलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. तेथील समाधीस्थळ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील झाडांवर वटवाघळांची गर्दी हे एक विशेष आकर्षण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महेंद्रशेठ यांनी मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानला २५,००० रुपयांची आर्थिक मदत दिली, जी संस्थेचे अध्यक्ष संजय तडाके यांनी स्वीकारली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज चव्हाण होते, तर प्रमुख पाहुण्यांमध्ये ॲड. संभाजी मोहिते, भानुदास माळी, अशोकराव थोरात यांचा समावेश होता.