महाड शहरातील सर्व दुकाने व आस्थापनांनी १५ दिवसांच्या आत मराठी भाषेतील नामफलक लावावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा लेखी इशारा मनसेने महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठी भाषेत असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अंतिम मुदत संपूनही महाड शहरातील काही दुकानदारांनी अद्याप मराठी भाषेतील नामफलक लावलेले नसल्याचा आरोप करत, मनसे शहराध्यक्ष पंकज उमसरे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाड नगरपालिकेकडे केली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनानुसार, पुढील १५ दिवसांत सर्व दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका सचिव अमोल दळवी, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, शहराध्यक्ष शंतनू पिसाट, रायगड जिल्हा संघटक शेखर सावंत, प्रदीप पिसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.