अलिबाग जिल्हा रुग्णालयासमोर मंडपामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न

अलिबाग जिल्हा रुग्णालयासमोर मंडपामुळे वाहतुकीचा प्रश्न
अलिबाग | अमुलकुमार जैन 
अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीसमोर उभारण्यात येत असलेल्या मंडपाची लोखंडी संरचना रस्त्याच्या मध्यभागापर्यंत आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा रुग्णालय परिसरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गावर मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने रुग्ण, नातेवाईक, रुग्णवाहिका तसेच इतर वाहनचालकांना सावधपणे मार्ग काढावा लागत आहे. पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.
दरम्यान, हा मंडप कोणत्या उद्देशाने उभारला जात आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. सार्वजनिक रस्त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याबाबतही चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.