पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्प, कामार्ली येथे धरण सुरक्षित असून सोमवार (18 ऑगस्ट 2025) रोजी सकाळी 11.28 वा. धरणाचे सहा उभे दरवाजे प्रत्येकी 20 सें.मी. उघडण्यात आले आहेत. सध्या धरणाची पाण्याची पातळी 85.10 मीटर असून सांडव्यातून 20 सें.मी. खोलीने पाणी वाहत आहे. या अनुषंगाने 119.54 घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगेश्वरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाची संकल्पित संचय पातळी 83.10 मीटर असून संपूर्ण जलाशय पातळी 86.10 मीटर आहे. सध्या धरणातील एकूण साठा 141.587 दलघमी असून उपयुक्त साठा 139.077 दलघमी आहे, जो 96 टक्के इतका आहे. आज परिसरात 69 मिमी पाऊस नोंदवला गेला असून आतापर्यंतचा एकूण पाऊस 2345 मिमी इतका झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पुढील पावसाची तीव्रता आणि हवामानाचा अंदाज यावर आधारित विसर्गाचे प्रमाण बदलू शकते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
धरण सुरक्षित असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, नदीकाठच्या गावांतील लोकांनी सावधानता बाळगावी, नदीकाठावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अद्यावत पूरस्थितीबाबत वेळोवेळी प्रशासनाकडून माहिती देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.