ग्रामस्थांकडून कर वसुली करण्यासाठी तत्पर असलेल्या हाळ खुर्द ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही का? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली ग्रामपंचायतीची मुख्य पाणीपुरवठा जलवाहिनी गेल्या अनेक दिवसांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. या जलवाहिनीतून दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असून रस्त्यावर डपके पडून त्यात तलावा सारखे पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे.पाण्याची ही उघडपणे होणारी नासाडी रोखण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसळ्याचे ग्रामस्थानांमधून बोलले जात आहे.
मुख्य जलवाहिनी फुटून अनेक दिवस उलटले, तरी तिच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे? पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? संबंधित लोकप्रतिनिधी आणि ग्रामविकास अधिकारी या समस्येकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार? असे अनेक प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायतीच्या बोअरवेलमधील पंपात बिघाड झाल्याने हाळ गावातील काही भागांचा पाणीपुरवठा तब्बल सहा ते सात दिवस विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन दिल्यानंतर पंप दुरुस्त करून अथवा बदलून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, या घटनेनंतरही पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने कितपत गांभीर्य दाखवले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
एकीकडे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या मुख्य जलवाहिनीतून पिण्याचे पाणी वाया जात असताना त्याकडे दुर्लक्ष करायचे, हा नेमका कोणता कारभार? जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नाही की प्रशासनाकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे? कारण काहीही असले तरी पाण्याची नासाडी थांबवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाचीच आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने फुटलेल्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी. तसेच पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी आणि अनेक दिवस उलटूनही जलवाहिनीची दुरुस्ती का करण्यात आली नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामस्थांच्या घशाला कोरड आणि पिण्याचे पाणी मात्र रस्त्यावर! कर वसुलीसाठी तत्पर असलेल्या ग्रामपंचायतीला पाण्याची गळती रोखण्यासाठी आणखी किती दिवस लागणार? ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन असेच दुर्लक्ष करणार की आता तरी जागे होऊन ठोस कार्यवाही करणार, याकडे हाळ खुर्द ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.