स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; देहव्यापार प्रकरणी दोघांना अटक, दोन महिलांची सुटका

रायगड | अमुलकुमार जैन
नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने वाशी परिसरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकून कथित देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत स्पा सेंटरच्या महिला संचालिकेसह एका व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांना संबंधित स्पा सेंटरमध्ये अनैतिक कृत्ये सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाने प्रथम बनावट ग्राहक पाठवून पडताळणी केली. माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला. कारवाईदरम्यान दोन महिलांना तेथून ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणात स्पा सेंटरच्या संचालिका सविता संतोष जैसवाल (वय ४०) आणि व्यवस्थापक विनायक लहू कावले (वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपींनी महिलांना स्पामध्ये बॉडी मसाजच्या कामासाठी ठेवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्याचे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली तसेच अनैतिक देहव्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास मानव तस्करी प्रतिबंधक कक्षाकडून करण्यात येत आहे.