एकाच दिवशी, एकाच ठिकाणी पठ्ठ्या दोन वेगवेगळ्या मालकांसाठी दारू गाळताना पोलिसांच्या ताब्यात, दोन्ही मालक फरार

उरण | विठ्ठल ममताबादे 
उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने अवैध हातभट्टीविरोधात धडक कारवाई करत अवघ्या दोन तासांच्या अंतराने दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६२ वर्षीय हिरामण काशिनाथ म्हात्रे याला दोन्ही प्रकरणांत आरोपी करण्यात आले आहे.

पहिली कारवाई २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता चाणजे गावातील रवि दामोदर म्हात्रे यांच्या मालकीच्या जागेत करण्यात आली. यावेळी हिरामण म्हात्रे हा गावठी दारू गाळताना रंगेहाथ आढळून आला. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून २०० लिटर क्षमतेचे आठ निळे ड्रम, गूळ-पाणी मिश्रित द्रावण, अल्युमिनियमची टाकी, खुंडी, पातेले, लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन आणि काळा गूळ असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत हिरामण म्हात्रे याने हे काम रवि म्हात्रे यांच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली असून रवि म्हात्रे फरार आहे.

त्यानंतर रात्री ८.४० वाजता त्याच ठिकाणी पुन्हा छापा टाकण्यात आला. यावेळीही हिरामण म्हात्रे हा अनिल म्हात्रे यांच्या सांगण्यावरून गावठी दारू गाळताना आढळला. या कारवाईत २०० लिटरचे सात ड्रम, गूळ-पाणी मिश्रित द्रावण, अल्युमिनियम टाकी, स्टील टाकीचा लोखंडी स्टोव्ह, डिझेल कॅन आणि काळा गूळ असा २७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात अनिल म्हात्रे हा देखील फरार आहे.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने हिरामण म्हात्रे याला बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले. दोन्ही घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत देशमुख आणि गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांदवे पुढील तपास करत आहेत.

एकाच दिवशी, एकाच जागेवर आणि एकाच आरोपीला दोन वेगवेगळ्या व्यक्तींसाठी अवैध दारू गाळताना पकडल्याने उरण तालुक्यातील हातभट्टी व्यवसायाचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. गुन्हे शाखेच्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.