दक्षिण रायगडमध्ये मनसेला नवचैतन्य देणार; मुंबई-गोवा महामार्ग, किल्ले रायगड व चवदार तळ्यासाठी संघर्ष करणार – राज पार्टे

महाड | प्रतिनिधी 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनियुक्त दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पक्षप्रमुख Raj Thackeray यांच्या आदेशानुसार किल्ले रायगड, चवदार तळे, मुंबई-गोवा महामार्ग तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी संघर्ष करून दक्षिण रायगडमध्ये मनसेला नवचैतन्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
पोलादपूरचे भूमिपुत्र असलेले आणि मुंबईत कार्यरत असलेले मनसेचे धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राज पार्टे यांच्यावर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी महाड व पोलादपूर परिसराचा दौरा करत विविध स्थानिक प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ऐतिहासिक चवदार तळ्यावरील गाळ काढण्याच्या व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून संबंधित माहिती घेतली.
मुंबई-गोवा महामार्गावरील चांढवे टोलनाका सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर राज पार्टे यांनी टोलनाक्यावर आंदोलन छेडले होते. माणगाव व इंदापूर बायपाससह संपूर्ण महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या आंदोलनाची दखल राज्यातील संबंधित मंत्र्यांनी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय किल्ले रायगडावरील निकृष्ट दर्जाची कामे आणि पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत नाराजी व्यक्त करत, रायगड विकास प्राधिकरण व संबंधित यंत्रणांविरोधात लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाड एमआयडीसीमधील वाढती बेरोजगारी आणि स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नासाठीही संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दहा वर्षांत मनसेने महाडमध्ये एकही निवडणूक लढवली नसल्याचे नमूद करत, आगामी काळात पक्षसंघटना मजबूत करून निवडणुका लढवल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाड एमआयडीसीतील सर्व कारखान्यांमध्ये आणि मुंबई-गोवा महामार्गावरील फलकांवर मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद पवार, शहराध्यक्ष पंकज उमासरे, माणगाव तालुकाध्यक्ष श्रीरंग सुखदरे तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.