पनवेल-जेएनपीटी महामार्गावरील करंजाडे परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वेळेत उपचार मिळाले. ॲम्बुलन्सची प्रतीक्षा न करता जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचण्यास मोठी मदत झाली.
करंजाडे येथील रहिवासी प्रदीप दास (वय ४१) हे पळस्पे ते अटल सेतू मार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव स्विफ्ट कारने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. याच वेळी उरणकडे जात असलेले उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्या निदर्शनास ही घटना आली.
जखमीची गंभीर अवस्था पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी कोणताही विलंब न करता वाहन थांबवून मदतकार्य सुरू केले. ॲम्बुलन्सची वाट न पाहता त्यांनी जखमीला खाजगी वाहनातून तातडीने एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या. तसेच घटनेची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर बीट मार्शल पोलीस हवालदार अमीर मुलाणी व पोलीस शिपाई सुरेश जौंजाळ यांनी रुग्णालयात जाऊन उपचारासाठी आवश्यक समन्वय साधला.
रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले असून जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेत वाहतूक पोलिसांनी दाखवलेले प्रसंगावधान, तात्काळ निर्णयक्षमता आणि मानवतावादी दृष्टिकोन विशेष उल्लेखनीय ठरला. सुवर्णक्षणात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे अपघातग्रस्ताचा जीव वाचण्यास मदत झाली असून नागरिकांकडून वाहतूक पोलिसांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.