मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी मुरुड तालुक्यात विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून ३० जूनपासून बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) घराघरांत जाऊन मतदारांकडून फॉर्म भरून घेणार आहेत. तालुक्यात सुमारे ६८ हजार मतदार असून ७२ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
तहसीलदार आदेश डफळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ८६ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध तयारी केली आहे.
३० जूनपासून बीएलओ मतदारांच्या घरी भेट देऊन SIR फॉर्म भरून घेतील. फॉर्मची एक प्रत मतदाराकडे तर दुसरी प्रत बीएलओकडे राहणार असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाणार आहे. मतदारांनी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रंगीत पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी तयार ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही मोहीम मतदार यादीतील त्रुटी दूर करून लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे तहसीलदार डफळ यांनी सांगितले. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून आपली माहिती अचूकपणे नोंदवून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
येत्या काही दिवसांत मुरुड तालुक्यातील प्रत्येक मतदाराच्या दारी प्रशासन पोहोचणार असल्याने “मतदारांनो सज्ज व्हा, बीएलओ तुमच्या दारी येत आहेत!” असा संदेश प्रशासनाने दिला आहे.