सुकेळी खिंडीत दुर्दैवी अपघात! दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

सुकेळी खिंडीत दुर्दैवी अपघात! दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

सुकेळी (दिनेश ठमके) :
अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेळी खिंडीत सोमवारी (७ जुलै) दुपारी सुमारास भीषण अपघात झाला. नागोठणे बाजूकडील वळणावर टीव्हीएस एनटॉर्क मोटरसायकलचा ताबा सुटून झालेल्या अपघातात क्रिश देवा साउथी (२०, मूळ नेपाळ, रा. मुंबई) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पाठीमागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी (१८, रा. घणसोली, ठाणे) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सुकेळी येथील बी.सी. जिंदाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, क्रिश हा आपल्या टीव्हीएस एनटॉर्क (क्र. MH 43 CJ 7702) मोटरसायकलवरून मुंबईकडे जात असताना विजय हॉटेलसमोरील वळणावर उतारावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मोटरसायकल थेट डिव्हायडरला आदळून रस्त्याच्या कडेला घसरली. अपघातात क्रिशच्या डोक्याला जबर मार लागला होता. महामार्ग पोलीस व स्थानिक मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही जिंदाल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी क्रिशला मृत घोषित केले, तर जास्मिनच्या डोक्याला मार व उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. 
या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन हटवून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *