समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा नवा अध्याय

समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा नवा अध्याय
PEN न्यूज ऑनलाइन टीम :  : 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर देशातील पहिला पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. बुलढाणा येथील कांरजालाड आणि वाशिम जिल्ह्यातील मेहकर इंटरचेंज येथे या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित झाला असून 9 मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जेतून वीज निर्मितीला प्रारंभ झाला आहे. त्यापैकी कांरजालाड येथे 3 मेगावॅट आणि मेहकर येथे 2 मेगावॅट क्षमतेच्या वीज निर्मितीला गती मिळाली आहे.
नागपूर–मुंबईला जोडणाऱ्या 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर आतापर्यंत 2.25 कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. या महामार्गाच्या आराखड्यावेळीच सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महामंडळाने एकूण 204 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प या महामार्गावरील विविध इंटरचेंजवर उभारण्याचे ठरवले असून, महसूल मिळवण्यासाठी टोलव्यतिरिक्त नवा स्त्रोत उपलब्ध झाला आहे.
महासमृद्धी रिन्युएबल एनर्जी लि. आणि महावितरण यांच्यातील 2022 मधील करारानुसार, ही वीज 3.05 रुपये प्रति युनिट दराने विकली जाणार आहे. भविष्यात इतर प्रस्तावित महामार्गांवरही असे प्रकल्प राबवण्याचा विचार असून, कार्बन क्रेडिटमुळे महामंडळाला पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी कर्ज मिळवणे सोपे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *