नेरळ येथील रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा क्र. १ च्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वर्गखोल्यांच्या छतामधून पाणी गळत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षण विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीतच गळती होत असल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पाणी साचणे, भिंती ओलावणे आणि शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत असल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, शिक्षक व कर्मचाऱ्यांना साहित्य प्लास्टिकने झाकून ठेवावे लागत असून, गळणारे पाणी अडविण्यासाठी ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागत आहेत. या प्रकारामुळे पालकांनी तीव्र चिंता व्यक्त करत कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागासह रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
पालक आणि स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या बांधकामाची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पावसाळा सुरू असतानाच गळतीची समस्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त वातावरणात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि कर्जत पंचायत समिती प्रशासन या गंभीर समस्येची किती तत्परतेने दखल घेते, याकडे संपूर्ण नेरळ परिसराचे लक्ष लागले आहे.