रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका रिक्षाचालकाने आपल्या अल्पवयीन मुलीच्या हातात भररस्त्यावर रिक्षाचे स्टिअरिंग दिल्याची घटना समोर आली असून, या बेफिकीर कृतीमुळे केवळ रिक्षातील मुलांच्याच नव्हे तर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.
ही घटना मुंबई–पुणे जुन्या महामार्गावरील गुडलक चौकाजवळ घडली. याबाबत आकाश नेताजी डोंगरे (वय २०, खोपोली) यांनी खोपोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी रिक्षाचालक मिंलीद चिमाजी गायकवाड (वय ४३, रा. बौद्धवाडा, चिंचवली, खोपोली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४६/ए.झेड.५८४५ क्रमांकाची ऑटो रिक्षा त्यांच्या अल्पवयीन मुलगी संचिता हिच्याकडे चालविण्यास दिली. मुलीकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्यांनी हा धोकादायक प्रयोग केला. त्या वेळी रिक्षामध्ये तीन ते चार शाळकरी मुली मागच्या सीटवर बसलेल्या होत्या.
भररस्त्यावर सुसाट धावणाऱ्या या रिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये रिक्षाचालक बाजूला बसून मुलीला मार्गदर्शन करताना दिसतो आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा र.नं. २९८/२०२५ अन्वये भारतीय नव दंड संहिता २०२३ च्या कलम १२५ तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम ५/१८१, २१(२०)/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जबाबदारीचा प्रश्न पुन्हा चर्चेत
अल्पवयीन मुलींच्या हातात वाहन देण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचा व्हिडिओ नवी मुंबईतून समोर आला होता. सरकार आणि आरटीओ विभागाकडून वारंवार सूचना देऊनही अशा प्रकारच्या बेपर्वा वर्तनाला आळा बसत नाही, ही बाब चिंताजनक आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे की, “वाहतूक सुरक्षिततेबाबत नागरिक आणि प्रशासन किती सजग आहेत?” खोपोली पोलिसांनी तातडीने कारवाई केली असली तरी, अशा निष्काळजी कृत्यांवर कठोर दंड आणि जनजागृती या दोन्ही उपायांची नितांत गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.