व्याह्याचा व्याह्यावर हल्ला; मुलगा-मुलीच्या पळून जाऊन लग्नामुळे संताप, पोलादपूरमध्ये घटनेची मात्र जोरदार चर्चा

Maramari
पोलादपूर | शैलेश पालकर 
 तालुक्यातील कामथे फौजदारवाडी येथे फिर्यादीच्या मुलाने आरोपीच्या मुलीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केल्याची घटना 8 मार्च रोजी घडली असून आरोपी विरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यात व्याह्याने व्याह्याचा अनोखा सत्कार केल्याच्या या घटनेची चर्चा तालुक्यातील सगळयाच समाजामध्ये होत आहे.
पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08मार्च 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कामथे माडाची वाडी येथे फिर्यांदी सखाराम गणपत कदम (वय 55 वर्षे, रा.कामथे फौजदारवाडी, पो. बोरघर, ता.पोलादपुर) यांचा मुलगा आदेश कदम हा वाई येथे कामाला असुन तो दिनांक 13 मार्च 2026 पासून वाई येथून मिसिंग आहे.  सखाराम कदम यांचा मुलगा आदेश याने आरोपी नामदेव सखाराम गोगावले (रा. कामथे फौजदारवाडी) यांच्या मुलीबरोबर पळुन जावुन लग्न केले. त्या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी नामदेव गोगावले यांनी फिर्यादी यास तु गावात राहु नकोस, असे बोलुन शिवीगाळी करुन ठार मारण्याची धमकी देत हातातील लाकडी काठीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला मारुन जबर दुखापत केली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाणे गु.र.नं.21-2026, भा.न्या.सं. 117(2),351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार कृष्णा जागडे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.