पेण तालुक्यातील वडखळ परिसरात प्रसाद देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी वृद्धांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.२५ वाजता गडब गावाजवळ जांभेला गावाच्या वेशीजवळील रस्त्याच्या कडेला घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडब येथील गजानन बाळाराम पाटील (वय ६६) हे रस्त्याच्या कडेला लाकडी बाकावर बसले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी पिशवीत बिस्किटांचे पुडे असल्याचे सांगत त्यामध्ये प्रसाद असल्याचे सांगितले व तो गावात वाटण्यासाठी चार हजार रुपये पिशवीत ठेवण्यास सांगितले. तसेच प्रसादासाठी सोन्याच्या अंगठ्या काढून पिशवीत ठेवण्यास सांगून बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांनी फिर्यादींच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेऊन पसार झाले. या अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
याचप्रमाणे कोलेटीवाडी येथील नारायण कमळ्या ठाकूर (वय ७५) यांचीही एक अंगठी अशाच पद्धतीने फसवून नेल्याचे समजते. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह गायकवाड पुढील तपास करीत आहेत.