आमटेम-पालखारमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी; वडखळ पोलीस ठाणे आवारातही पुन्हा राडा, अनेकांवर गुन्हे दाखल

#Wadakhal police station
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आमटेम-पालखार गावात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून तुफान हाणामारीची घटना घडली असून या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणातील संबंधित दोन्ही गट चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आले असताना तेथेही पुन्हा मारामारी झाली. त्यामुळे पोलिसांनी अनेक जणांवर गुन्हे दाखल करत काहींना अटक केली आहे. ही घटना ३ व ४ मार्च २०२६ रोजी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पालखार येथील रविंद्र राध्या म्हात्रे (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते आणि त्यांचे सहकारी शिवजयंती कार्यक्रमाच्या नियोजनासाठी साक्षीदार चंद्रकांत म्हात्रे यांच्या घरी चर्चा करत होते. त्यावेळी प्रतीक मोहन म्हात्रे याने फोन करून शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला. त्याबाबत विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे सहकारी आरोपीच्या घरी गेले असता प्रतीक म्हात्रे याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. तसेच प्रणित म्हात्रे याने त्यांना खाली पाडले, तर विकेश म्हात्रे याने साक्षीदाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत प्रतीक मोहन म्हात्रे यांनीही प्रतितक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार प्रेम म्हात्रे, रवि म्हात्रे, राज म्हात्रे, अजय म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, अविनाश म्हात्रे आणि जयेश भोईर यांनी संगनमत करून त्यांच्या घरात घुसून कोयत्याने मारहाण केली व त्यांना जखमी केले. या घटनेत फिर्यादीची पत्नीही जखमी झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दोन्ही गटांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यानंतर ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता दोन्ही गटातील लोक वडखळ पोलीस ठाण्यात तपासासाठी आले असताना पुन्हा एकदा वाद उफाळून आला. दोन्ही गटांनी पोलीस ठाणे आवारातच एकमेकांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये प्रेम बबन म्हात्रे ( वय 32, रा. रा पालखार)  राज बबन म्हात्रे (वय 29, रा. रा पालखार), अजय अशोक म्हात्रे ( वय 32, रा. रा पालखार),  प्रकाश राध्या म्हात्रे, (रा. रा पालखार),  अविनाश दिलीप म्हात्रे, रा. रा पालखार,  जयेश पुंडलिक भोईर, रा. पालखार, महेश भिकाजी म्हात्रे, रा. पालखार,  बेबीबाई दिलीप म्हात्रे, रा. पालखार,  पार्वती पुंडलिक भोईर, रा. पालखार, संजय रघुनाथ म्हात्रे, रा. पालखार,  कल्पना संजय म्हात्रे, रा. पालखार,  प्रितम संजय म्हात्रे, रा. पालखार, परशुराम सोमा तांबोळी, रा. आमटेम,  कैलास तुकाराम म्हात्रे, रा. पालखार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून यातील तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आठ जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून तीन जण फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आमटेम-पालखार गावातील या वादात दोन वेगवेगळ्या राजकीय गटांचा संबंध असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून वडखळ पोनि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.