रायगड जिल्ह्यात गाजलेल्या लोणेरे येथील निर्घृण हत्याकांडाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (वय ३८, रा. मालदारवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याला पोलिसांनी ठाणे शहरातून ताब्यात घेतले.
२१ एप्रिल २०२६ रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ६४ तसेच ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये एका तरुणीवर कोयत्याने वार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
पोलीस अधीक्षक आँचल दलाल व अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBच्या दोन पथकांसह विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ठाणे परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथील लॉज व डॉरमेट्री तपासून अखेर आरोपीला अटक केली.
तपासात आरोपीवर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही उघड झाली आहे. दरम्यान, आरोपीला अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारी अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला.
या प्रकरणाचा पुढील तपास महाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे करत आहेत.