लालपरीचं लोकेशन आता अॅपवर! नवं तंत्रज्ञान प्रवाशांच्या सेवेत १५ ऑगस्टपासून

St location
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
आपली एसटी कुठे पोहोचली आहे, हे आता प्रत्यक्ष पाहता येणार आहे — तेही मोबाइल अॅपच्या माध्यमातून! राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांसाठी एक अत्याधुनिक मोबाईल अॅप विकसित केलं असून, या अॅपमुळे एसटी बसचे लाईव्ह लोकेशन आणि थांब्यांवरील आगमनाचा अचूक अंदाज मिळणार आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून हे अॅप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
राज्यातील १४,५०० बसमध्ये GPS यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे. सध्या १२,००० बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. उर्वरित बसमध्येही लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमुळे आता प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत थांबावं लागणार नाही. अॅपवरूनच बस कोणत्या ठिकाणी आहे, किती वेळात पोहोचणार आहे, हे कळणार आहे.
राज्यात दररोज सुमारे ५०,००० मार्गांवर सव्वालाख फेऱ्या एसटीमार्फत केल्या जातात. लाखो प्रवासी ग्रामीण भागातून एसटीचा वापर करतात. रेल्वे नसलेल्या भागांत एसटी हाच प्रवासाचा आधार आहे. विशेषतः आगाऊ आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सुविधा फारच उपयुक्त ठरणार आहे.
अॅपद्वारे प्रत्येक प्रवाशाला आपलं तिकीट नंबर टाकून संबंधित बसचे रिअल टाइम लोकेशन आणि बस स्थानकावर पोहोचण्याचा अंदाजित वेळ बघता येईल. त्यामुळे मधल्या थांब्यांवरही किती वेळाने बस येणार हे कळेल, आणि अनावश्यक वाट पाहणं टळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *