तालुक्यातील पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज सकाळी गरोदर महिलेला ए.एन.सी. तपासणीसाठी आणण्यासाठी जात असताना पाचाड घाटातील तीव्र वळणावर रुग्णवाहिकेचा टायर अचानक फुटला. सुदैवाने अनुभवी चालक अनंत औकिरकर यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि रुग्णाचा जीव वाचला.
या घटनेनंतर, संबंधित रुग्णवाहिकेची ऑनलाईन ॲपवर कागदपत्रे तपासली असता आणखी गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. रुग्णवाहिका क्रमांक एमएच ०६ बी डब्ल्यू ५४०२ हिचा इन्शुरन्स १३ मे २०२२ रोजीच संपलेला असून, वाहनाचा फिटनेसही केवळ २६ मे २०२३ पर्यंतच वैध असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच गेल्या दीड-दोन वर्षांपासून ही रुग्णवाहिका बेकायदेशीर आणि धोकादायक स्थितीत रस्त्यावर धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेचे चारही टायर पूर्णतः झिजलेले (गोटा झालेले) असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. डोंगराळ, अरुंद व वळणावळणाच्या पाचाड घाटात अशा अवस्थेतील रुग्णवाहिका चालवणे म्हणजे थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ असल्याचा संतप्त आरोप नागरिकांकडून होत आहे.
गरोदर महिला, गंभीर रुग्ण व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका ही जीवनरेषा असते. मात्र इन्शुरन्सविना, फिटनेसविना आणि कोणतेही मेंटेनन्स नसलेली वाहने रुग्णसेवेच्या नावाखाली मृत्यूला आमंत्रण देत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील सर्व रुग्णवाहिकांची तातडीने तपासणी करण्यात यावी, तसेच इन्शुरन्स व फिटनेस थकीत असलेल्या वाहनांवर आरटीओ विभागाने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. वेळेत पावले उचलली नाहीत, तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.