रोहा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आपली सत्ता कायम राखत शहरावर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वनश्री समीर शेडगे यांनी तब्बल ४६९५ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत राजकीय इतिहास घडवला आहे. या विजयासोबतच त्यांनी त्यांचे वडील, माजी नगराध्यक्ष समीर जनार्दन शेडगे यांचे नऊ वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे.
२०१६ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या समीर शेडगे यांना केवळ ६ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुलगी वनश्री शेडगे यांचा हा दणदणीत विजय अधिक भावनिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
आज झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना ८५८६ मते मिळाली, तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना ३८९१ मते मिळाली. एकूण १२,७०८ मते पडली असून, त्यापैकी २३१ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.
दरम्यान, रोहा नगरपालिकेत भाजपने तब्बल २४ वर्षांनंतर खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक ९ ब मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला मात्र केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले असून, प्रभाग क्रमांक ९ अ मधून सुप्रिया जाधव या विजयी झाल्या. त्यांच्या विजयामागे पक्षापेक्षा शिल्पा धोत्रे व अशोक धोत्रे यांनी प्रभागात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याची चर्चा शहरात आहे.
या निवडणुकीत बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, प्रभाग क्रमांक २ ब मध्ये राजेंद्र जैन यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. काही ठिकाणी उमेदवार पराभूत झाले असले, तरी एकूण चित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकलेले स्पष्टपणे दिसून आले.
प्रभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक 1 अ : राष्ट्रवादी विजयी – नीता महेश हजारे प्रभाग क्रमांक 1 ब : राष्ट्रवादी विजयी – प्रशांत कडू प्रभाग क्रमांक 2 अ : राष्ट्रवादी विजयी – फराह पानसरे प्रभाग क्रमांक 2 ब : राष्ट्रवादी विजयी – राजेंद्र जैन (बिनविरोध) प्रभाग क्रमांक 3 अ : राष्ट्रवादी विजयी – अफ्रिन रोगे प्रभाग क्रमांक 3 ब : राष्ट्रवादी विजयी – अरबाज मणेर प्रभाग क्रमांक 4 अ : राष्ट्रवादी विजयी – स्नेहा अंबरे प्रभाग क्रमांक 4 ब : राष्ट्रवादी विजयी – अहमद दर्जी प्रभाग क्रमांक 5 अ : राष्ट्रवादी विजयी – आलमास मुमेर प्रभाग क्रमांक 5 ब : राष्ट्रवादी विजयी – महेंद्र गुजर प्रभाग क्रमांक 6 अ : राष्ट्रवादी विजयी – गौरी बारटक्के प्रभाग क्रमांक 6 ब : राष्ट्रवादी विजयी – महेंद्र दिवेकर प्रभाग क्रमांक 7 अ : राष्ट्रवादी विजयी – प्रियांका धनावडे प्रभाग क्रमांक 7 ब : राष्ट्रवादी विजयी – रवींद्र चाळके प्रभाग क्रमांक 8 अ : राष्ट्रवादी विजयी – संजना शिंदे प्रभाग क्रमांक 8 ब : राष्ट्रवादी विजयी – महेश कोलटकर प्रभाग क्रमांक 9 अ : शिवसेना विजयी – सुप्रिया जाधव प्रभाग क्रमांक 9 ब : भाजपा विजयी – रोशन चाफेकर प्रभाग क्रमांक 10 अ : राष्ट्रवादी विजयी – पूर्वा मोहिते प्रभाग क्रमांक 10 ब : राष्ट्रवादी विजयी – अजित मोरे
या निकालांमुळे रोहा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत आनंद साजरा केला.