खोपोली नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने प्रचंड दबदबा कायम राखत शहराच्या राजकारणावर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडेंनी १,११८ मतांनी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित माजी नगराध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांचा पराभव केला. या दणदणीत विजयामुळे खोपोलीत भगवा लाट पसरली असून विरोधकांची राजकीय स्वप्ने भंग पावली आहेत. सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदावर विराजमान होत कुलदीपक शेंडेंनी आपली हॅट्रीक पूर्ण केली.
या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट तसेच शिशिर धारकर यांच्या “आम्ही खोपोलीकर आघाडी”सह विविध पक्ष रिंगणात होते. मात्र महायुतीने सर्व विरोधकांना मागे टाकत स्पष्ट व निर्णायक विजय मिळवला. नगरपरिषदेत १५ प्रभागांपैकी महायुतीने १४ जागांवर वर्चस्व मिळवले. यात राष्ट्रवादी काँग्रेसला ७, भाजपला ४, शेतकरी कामगार पक्षाला ४, शरद पवार गटाला १ आणि अपक्षाला १ जागा मिळाल्याचे चित्र समोर आले. या निकालामुळे महायुतीची सत्ता अधिक भक्कम झाली असून विरोधकांना मोठा राजकीय धक्का बसला आहे.
मतदान प्रक्रियेत खोपोलीकरांनी शांततेत आपला कौल दिला. एकूण ६२,०७४ नोंदणीकृत मतदारांपैकी ४२,४४८ मतदारांनी मतदान केले, म्हणजेच ६८ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली नियोजनबद्ध, आक्रमक आणि बूथनिहाय प्रचारयंत्रणा या विजयामागे निर्णायक ठरली. या निकालामुळे खोपोली शहराला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर नेतृत्व मिळाले असून, महायुतीच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.