धाटाव औद्योगिक वसाहतीतील रोहा डाय केम कंपनीच्या आवारात स्वतःला आयकर विभागाचे अधिकारी सांगणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकार संदीप सरफळे यांच्याशी अरेरावी करत त्यांना बळजबरीने कंपनीच्या आवारात नेऊन धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ रोहा प्रेस क्लबने तहसीलदार आणि रोहा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल करून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दैनिक सामना वृत्तपत्राचे वार्ताहर संदीप पांडुरंग सरफळे हे रोहा डाय केम कंपनीतील निवृत्त कामगार देवलिंग जंगम यांच्यावरील कथित अन्यायाबाबत माहिती घेण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेले होते. त्यावेळी काही व्यक्तींनी आपण आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले; मात्र अधिकृत ओळखपत्र न दाखवता सरफळे यांना त्यांच्या वाहनातून बाहेर काढून कंपनीच्या आवारात नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्याशी अपमानास्पद भाषा वापरून एफआयआर दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे संबंधित व्यक्ती खरोखरच आयकर विभागाचे अधिकारी होते का, त्यांना अशी कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार होता का आणि घटनास्थळी उपस्थित पोलिसांची भूमिका काय होती, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित व्यक्तींची ओळख व अधिकारांची पडताळणी करावी, कंपनीच्या प्रवेशद्वारावरील आणि आवारातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे तसेच पोलिसांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी रोहा प्रेस क्लबने केली आहे.
या प्रकरणात पत्रकारांच्या पाठीशी उभे राहत रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील पत्रकार, शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. पत्रकाराला कर्तव्य बजावताना धमकावण्याचा प्रकार घडला असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपांची सत्यता तपासून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या वेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, सुहास खरिवले, अल्ताफ चोरडेकर, महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, दिनेश मोरे, सचिन साळुंखे, जितेंद्र जाधव, उद्धव आव्हाड, शरद जाधव, महेश बामुगडे, रघुनाथ कडू,अमोल पेणकर, दिनकर खरिवले, किरण मोरे, अक्षय जाधव, केशव म्हस्के, प्रसाद आढाव, राकेश मोरे, नितेश सकपाळ, महेश मोहिते, विश्वजीत लुमण, समीर बामुगडे, अंजूम शेट्ये यांच्यासह शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.