पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीतून वाहणाऱ्या कासाडी नदीत केमिकल टाकून प्रदूषण करण्याच्या प्रकारावर शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी कारवाईची मागणी केली आहे. या रासायनिक प्रदूषणामुळे पडघे गावाजवळील नदीकिनारी अनेक मासे व गुरे मृत्यूमुखी पडले असून, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
पूर्वी स्वच्छ व पांढरी शुभ्र असलेली कासाडी नदी आता काळवंडली असून, औद्योगिक कारखाने घनकचरा, सांडपाणी व रसायने बिनधास्त नदीत सोडत असल्याचे उघड झाले आहे. पडघे गावाजवळील काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड बांधून गोण्यांमध्ये रसायनमिश्रित पदार्थ साठवले आहेत आणि हे केमिकल लपूनछपून नदीत सोडले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच शिवसैनिकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आरोपी पळून गेले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अशा कारखाने व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आवाहन केले आहे.