प्रधानमंत्री जनजाती अभियान (पीएम–जनमन) अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड आणि खालापूर तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनचे आयुक्त मा. कैलास पगारे तसेच मा. विजय क्षीरसागर यांनी भेट देऊन बालविकास कामकाजाचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी अंगणवाडीतील सुविधा, सेविका व लाभार्थ्यांशी संवाद साधत उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले.
पेण तालुक्यातील मालवाडी आदिवासी वाडीवरील नव्या अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन आयुक्त कैलास पगारे यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी ‘लेक लाडकी योजना’ लाभार्थ्यांना धनादेश वितरण, ‘मातृ वंदना योजना’ अंतर्गत पहिल्या हप्त्याचे प्रमाणपत्र वाटप, बेबी केअर किट वितरण, विद्यारंभ प्रमाणपत्र देऊन बालकांचा सन्मान, गरोदर मातांसाठी ओटीभरण, सहा महिन्यांच्या बालकांसाठी अन्नप्राशन, ‘नवचेतना मेळावा’ आणि आधार कॅम्प असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
पोषण माह २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेविका व पर्यवेक्षिकांचा गौरव मा. आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. अंगणवाडीतील बालकांच्या नावाने फळझाडे लावून वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला.
यानंतर खालापूर तालुक्यातील सक्षम किट प्राप्त अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पगारे सरांनी त्या किटमधील साहित्य व इन्स्टॉलेशनची पाहणी केली. सुधागड प्रकल्प कार्यालयाने ‘Vocal for Local’ या संकल्पनेवर आधारित सेविकांनी तयार केलेल्या पाककृती पुस्तिकेचे मा. आयुक्तांनी विशेष कौतुक केले आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
“१००० दिवस बाळाचे” या पुस्तकाचे वितरण गरोदर माता आणि सरपंचांना करून बाळाच्या जन्मापूर्वीपासून ते पहिल्या १००० दिवसांतील योग्य पोषण व संगोपनाचे महत्त्व आयुक्तांनी अधोरेखित केले. त्यांनी अंगणवाडी सेविकांना या विषयावर व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले.
या भेटीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे (आदिवासी विभाग, पेण), प्रविण पाटील (बालविकास प्रकल्प अधिकारी, पेण), तेजस्विता करंगुटकर (सुधागड), विशाल कोटागडे (खालापूर), तसेच बेलवडे व सिधेश्वर बुद्रुक ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेवांमध्ये नवचैतन्य संचारले असून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.