
उरण | विठ्ठल ममताबादे
उरण परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर दिवे नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष)च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या भावना घाणेकर यांनी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची मागणी केली आहे.
भावना घाणेकर यांनी नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांची भेट घेऊन उरणमधील संवेदनशील बाबींवर चर्चा केली. त्यांनी यशश्री शिंदे हत्याकांड झालेल्या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही आणि प्रकाशव्यवस्था नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच उरण रेल्वे स्थानकापासून शहराकडे जाणारा अंधारमय रस्ता, लाल मैदान, समुद्रकिनारपट्टी आणि सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखरेख वाढविण्याची मागणी केली.
चर्चेदरम्यान नवी मुंबई आणि उरण परिसरातील वाढत्या ड्रग्सविषयक तक्रारींचाही मुद्दा पुढे आला. भावना घाणेकर यांनी यावर तातडीने कारवाई होण्याची गरज व्यक्त केली. यावेळी उपायुक्त अमित काळे यांनी महिला सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था आणि ड्रग्सविरोधी कारवाईबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Related