रायगड जिल्ह्यात अपघातांचे वाढते प्रमाण; ५८७५ घटनांत ६८६ मृत्यू, ४४ ब्लॅक स्पॉट्स

माणगांव भीषण अपघात: ट्रक उड्डाणपुलावरून कारवर कोसळला; चारजण जखमी
अलिबाग (अमुलकुमार जैन) :
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक ४८), आणि मुंबई-गोवा मार्गावर – दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत असून, त्यानुसार अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या साडे पाच वर्षांत जिल्ह्यात एकूण ५८७५ अपघात झाले असून, त्यात ६८६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः तरुण आणि कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महामार्गांवरच्या अपघातांमागे वेग, वाहतुकीचे नियम मोडणे आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना जबाबदार आहेत. अपघातांत एकूण १४१८ जण गंभीर जखमी झाले असून, ५७८ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील ४४ ब्लॅक स्पॉट्स ओळखले गेले असून, त्या ठिकाणी वारंवार अपघात घडल्याने या क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. खोपोली, लोणेरे, खरोशी फाटा, तळवली, कशेडी घाट, आंबेनळी घाट यांसारख्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
जिल्हा वाहतूक शाखेमार्फत अपघात कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, आणि अपघातप्रवण क्षेत्रांवर सूचना फलक बसवण्यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. पर्यटकांची वाढती संख्या आणि औद्योगिकीकरणामुळे वाहतूक वाढली असून, प्रशासनाकडून अपघात टाळण्यासाठी सुवर्ण नियम फलक, ब्लॅक स्पॉट माहिती, आणि वाहनचालक प्रशिक्षण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
=======================
अपघात होऊ नये यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावून वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांद्वारे कारवाई केली जात आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
…अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *