राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत रायगड जिल्ह्यातील १ हजार ३३४ शेतकऱ्यांची तिसरी यादी १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील पात्र शेतकऱ्यांनी आपले कर्ज खाते आणि थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील बँकांनी या योजनेसाठी एकूण १२ हजार ६८२ थकीत कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. त्यापैकी पहिल्या यादीत ७ हजार ३६७, दुसऱ्या यादीत १ हजार ३७४ आणि तिसऱ्या यादीत १ हजार ३३४ शेतकऱ्यांचा समावेश असून, आतापर्यंत एकूण १० हजार ७५ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या तारखेनंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांच्या काही कर्ज खात्यांमध्ये थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या हेअरकट धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे. तसेच मयत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदवण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (SOP) निर्गमित करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.