रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या बहुतांश धरणांनी पूर्ण क्षमतेने पाणी साठविले असून, जिल्ह्याच्या जलसुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड यांनी २५ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील २८ लघु धरणांपैकी बहुतांश धरणे १०० टक्के भरली आहेत.
अहवालानुसार फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे, बामणोली आणि उसरण ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर श्रीगाव (अलिबाग), कार्ले, रानीवली, साळोख, अवसरे आणि पुनाडे या धरणांमध्ये ४३ ते ८८ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे.
आजच्या पर्जन्यमानात डोणवत येथे सर्वाधिक २२० मिमी, भिलवले येथे २०० मिमी, कलोते-मोकाशी येथे १५५ मिमी आणि कोंडगाव येथे ११४ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील लघु धरण क्षेत्रांमध्ये सरासरी ९४.३६ मिमी पाऊस झाला असून, हंगामातील एकूण पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, प्रमुख नद्यांवरही प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. भिरा पिकअप धरण परिसरात ५३.४० मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून, धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाची स्थिती नियंत्रणात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी आगामी काळात मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने धरण परिसर, नदीकाठ आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जलसाठा समाधानकारक असला तरी अतिवृष्टीमुळे परिस्थिती बदलू शकते, त्यामुळे संबंधित यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.