मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा नेहमीच वाहतूक कोंडी, पावसाळी धोके आणि अपघातांसाठी चर्चेत असतो. काल पुन्हा एकदा एक विचित्र अपघात घडला असून सहा वाहनांच्या साखळी धडकेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाताण बोगद्यात घडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला छोटा हत्ती टेम्पो (MH12BF7228) पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने घसरून पलटी झाला. यानंतर पाठोपाठ येणाऱ्या आयशर टेम्पो, ट्रॅव्हल्स बस, आणि अन्य वाहनांनी एकमेकांवर आदळत भीषण साखळी अपघाताला तोंड दिले. वाहनांच्या घसरगुंडीमुळे बोगद्याच्या भिंतीला धडक देणाऱ्या बससह एकूण सहा वाहने अपघातग्रस्त झाली.
या अपघातात परशुराम हेगडे (वय ४९, कोल्हापूर), लियाकत नालबंद (वय ७५), दीपक गावकर (वय ४२) आणि अनिल ढाकणे (क्रेन मदतनीस) हे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. आयआरबी यंत्रणेने पावसाळ्यातील निसरड्या रस्त्यांसाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.