मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात; IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू!

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सिनेमा पाहिल्यानंतर पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी लोणावळाकडे निघालेल्या सहा मित्रांच्या आनंदी प्रवासाचा शेवट भीषण अपघातात झाला. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातात IIT मुंबईच्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर मित्र हादरले आहेत.
भाड्याने घेतलेल्या फॉक्सवॅगन पोलो कारमधून प्रवास करत असताना भातान बोगद्याच्या पुढे सुमारे १.५ किमी अंतरावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कारने कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गाडीने अनेक कोलांटउड्या घेत अक्षरशः चक्काचूर झाला. महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कटरच्या साहाय्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून कामोठे येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.
या अपघातात मालेगावचा ओमकुमार नितीन बोरसे (२३), जयपूरचा श्रेयांश नरेश शर्मा (२०) आणि नागपूरचा लय प्रशांत देशभ्रतार (२१) यांचा मृत्यू झाला. हे तिघेही अत्यंत हुशार आणि होतकरू विद्यार्थी होते. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. अतिवेग किंवा चालकाचा थकवा हे अपघातामागील कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.