मुंबई-गोवा महामार्गावर इरवाडी नजीक भीषण अपघात; रामवाडी येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

रायगड | अमुलकुमार जैन
मुंबई-गोवा महामार्गावरील इरवाडी फाटा परिसरात मंगळवारी (ता. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पेण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश कैलास कोळी (वय २५, रा. रामवाडी, समर्थ नगर, ता. पेण) हा आपल्या होंडा शाईन दुचाकीचा क्रमांक एमएच ०६ सीआर ६१६८ मोटारसायकलने रामवाडीच्या दिशेने जात होते. यावेळी मौजे जेएसडब्ल्यू सिमेंट प्लांटजवळील इरवाडी फाटा परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या अज्ञात ट्रक/ कंटेनरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर सिद्धेश कोळी यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गणराज गजानन कोळी यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातचा अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत.