मित्राचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या आरोपीच्या सीमेवर आवळल्या मुसक्या

मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीला नेपाळ सीमेवरून अटक
रायगड (अमुलकुमार जैन) : 
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील देवन्हावे गावात हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्राचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पारस हरिहर सिंग (वय ५०, रा. बिहार) यांनी मित्र अख्तर हबीब बैठा (वय २७, रा. बिहार) यास उसने दिलेले सहा हजार रुपये परत मागितले होते. याचा राग येऊन अख्तर बैठा याने दगडाने मारहाण करून पारस सिंग यांचा जागीच मृत्यू घडवून आणला व पळून गेला.
या घटनेनंतर खोपोली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गुजरात व बिहारमध्ये फिरत असल्याची माहिती मिळूनही त्याचा शोध लागत नव्हता. अखेर तपास अधिकारी सुजित गडदे यांच्या पथकाने गोपनीय खबरींच्या मदतीने आरोपी अख्तर बैठा हा नेपाळमध्ये लपल्याचा ठावठिकाणा लावला. भारत–नेपाळ सीमेवर तो नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
अख्तर बैठा याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, पोहवा संदीप चव्हाण, पोशि प्रणित कळमकर, परसराम टेकाळे, किरण देवकाते आणि समीर पवार यांनी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *