माथेरान प्लास्टिक मुक्त केव्हा होणार ? स्थानिकांसमोर यक्षप्रश्न !

Matheran plastic
माथेरान (मुकुंद रांजाणे) : 
प्रदूषण मुक्त, स्वच्छ, सुंदर,हरित आणि शांत माथेरान अशी ओळख असणाऱ्या या स्थळावर सद्यस्थितीत विविध ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असल्याने माथेरान प्लास्टिक मुक्त केव्हा होणार ? असा स्थानिकांसमोर यक्षप्रश्न पडला आहे.काही वर्षांपासून याठिकाणी मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा यामध्ये पिण्याच्या प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, वेफर्स पाकिटे तसेच अन्य कचरा जंगलात अथवा पॉईंट्स भागात विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्याने अनेकदा पर्यावरण प्रेमी नागरिकांनी त्याबाबतचे फोटो समाजमाध्यमांवर टाकल्यावर तात्पुरती स्वच्छता राखली जाते. मुख्य प्रवेशद्वार पासून ते वन ट्री हिल पॉईंट्सच्या टोकापर्यंत पाहिल्यास जवळपास सर्वच जंगल भागात मोठया प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचा खच पडलेला निदर्शनास येत आहे. याच प्लास्टिक कचऱ्यामुळे असंख्य जुनी वृक्षवल्ली सुकून उन्मळून पडत आहेत याचा इथल्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.
नगरपरिषदेच्या माध्यमातून दरवर्षी घनकचरा व्यवस्थापन करिता करोडो रुपयांची उधळण केली जात असताना सुध्दा कचरा व्यवस्थित संकलन केले जात नाही याबाबत स्थानीक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरपरिषदेच्या कामगारांना,तसेच घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला याबाबत सूचना देऊन नियमितपणे स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.पॉईंट्स वरील स्टोल्स धारकांनी सुध्दा आपली या गावाविषयी नैतिक जबाबदारी म्हणून पर्यटकांकडून टाकण्यात आलेला कचरा गोळा करून जवळील कचराकुंडीत जमा केल्यास काहीअंशी का होईना स्वच्छतेला हातभार लागण्यास मदत होऊ शकते अन्यथा स्वच्छ माथेरान ही ओळख संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
===============================
 महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ज्या शहराची नावलौकिकता आहे. त्या माथेरानमध्ये अस्वच्छतेचे वातावरण असल्याने नुकताच मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन अस्वछते बाबत नाराजी व्यक्त केली. प्रेक्षणीय स्थळाजवळील आसपासच्या परिसरात पडलेल्या प्लास्टिक बॉटल्स व रॅपर्स यामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ शकते तसेच संपूर्ण बाजारपेठेतील अस्वछते व दुर्गंधी मुळे पर्यटक व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हॉटेलमधील रूमचा चेक आऊट 10 किंवा 11 वा नंतर होत असतो त्यामुळे संकलित येणाऱ्या कचऱ्याची वेळ सकाळ, संध्याकाळ अशा दोन सत्रात केल्यास रूमधारकांना ते सोयीचे होईल,दर किमान पंधरा दिवसातून प्रेक्षणीय स्थळावरील पडलेला कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. माथेरान गिरीस्थान नगरपरिषद घनकचऱ्यावर करोडो रुपये खर्च करते मग कुणा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावर प्लास्टिक बॉटल्स उचलण्याची वेळ येते हे अत्यंत दुर्दैवी आहे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून संबंधित विभागाचे मुकादम व अधिकारी यांची बैठक बोलावून त्याबाबत योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश द्यावेत तरच अस्वच्छतेबाबत समाधानकारक परिस्थिती निर्माण होईल.
…चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *