माथेरान घाटात दरड कोसळली; 10 तासांत 271 मिमी पाऊस, जीवितहानी टळली

माथेरान घाट रस्त्यात दरड कोसळली
कर्जत (गणेश पवार) : 
माथेरान घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडली. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र दरडीचा मलबा रस्त्यावर आल्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक काही काळ थांबली होती.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे फक्त 10 तासांत 271.4 मिमी इतका पाऊस माथेरानमध्ये नोंदला गेला. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा माथेरानमध्ये झाला असून, मागील दोन दिवसांपासून वातावरणात दाट धुके, गारवा आणि निसर्गरम्य धबधबे दिसत आहेत.
माथेरान व परिसर हा 700 हेक्टर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात येथील पर्जन्यमान जास्त असते; पण सप्टेंबरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. चार महिन्यांत आत्तापर्यंत 5462 मिमी (215.04 इंच) पाऊस पडला असून, 14 सप्टेंबर 2024 च्या तुलनेत यावर्षी 4.60 मिमीने जास्त पाऊस झाल्याचे आकडेवारीतून दिसते.
14 सप्टेंबरच्या रात्री 11 ते 15 सप्टेंबर सकाळी 8.30 वाजेपर्यंत 260 मिमी पाऊस झाला होता. यादरम्यान नागरखिंडीत दरड कोसळली. सुदैवाने कोणतीही गाडी त्या वेळी गेली नसल्यामुळे हानी टळली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जेसीबी पाठवून मलबा हटवला व वाहतूक सुरळीत केली. मात्र दरडीमुळे मोठ्या वाहनांची वाहतूक काही काळ बंद होती. कर्जत-माथेरान मिनीबसलाही घाटात प्रवेश न करता परत फिरावे लागले.
——————————————-
15 ऑगस्ट रोजी भरपूर पाऊस पडला असता मी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सांगितले होते की, या नागरखिंडीत आठवडा भराचे निरीक्षण केले असता. या डोंगराचे मास्क अतिवृष्टीमुळे तकलादू झाले आहे. ते पुन्हा असाच पाऊस झाला तर निसटू शकते. यावर कोणत्याही विभागाने माझ्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि आज तिथेच ही दरड कोसळली याच्यावर त्याच वेळेस उपाययोजना केली असती तर रस्त्यावर दरड आली नसती.
  ….प्रेरणा प्रसाद सावंत, माजी नगराध्यक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *