माथेरान पालिका प्रशासनाने दस्तुरीच्या मागील बाजूस असलेल्या एम.पी ९३ प्लॉटच्या जागे वरील अतिक्रमण हटवले असून आता माथेरान वाहनतळाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. माथेरान घाटात विकेंडला होणारी वाहतूक कोंडी आता कमी होणार असून सर्व स्थानिक नागरिकांनी, व्यावसायिकांनी याबाबत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
अनेक वर्षांपासून माथेरान एम.पी ९३ प्लॉटचा तिढा सुटण्यास दिरंगाई होत होती. अनेक वर्षे येथे खितपत पडलेला प्रश्न आता कुठे सुटला असून माथेरानमध्ये आपल्या खाजगी वाहनांनी येणाऱ्या पर्यटकांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. याबाबत सोम. दि.२७ रोजी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीमध्ये संबंधित अधिकारी वर्ग व माथेरान मधील स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. यामध्ये एम.पी ९३ प्लॉटच्या जागेवरील अतिक्रमण हटवून ही संपूर्ण जागा रिकामी करून सदरील प्लॉट माथेरान पालिकेकडे हस्तांतरीत करावा असा प्रमुख मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुरु.दि.३० रोजी मोठया पोलीस बंदोबस्तात माथेरान नगरपालिका मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी येथील एमपी ९३ वरील संपूर्ण अतिक्रमण हटवले आहे.
या जागेत मालवाहू घोड्यांचे तबेले बांधण्यात आले होते. या सर्व घोडे मालकांबरोबर चर्चा करून सदरील अतिक्रमण काढण्यात आले असल्याचे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले. अखेर माथेरान मधील एम.पी ९३ प्लॉट पालिकेकडे हस्तांतरित केले जाणार असून येथील वाहनतळातील पार्किंगचा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याने माथेरान स्थानिकां मधून प्रशासनाचे आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे तसेच हा एम.पी ९३ प्लॉट पालिकेला मिळावा या बाबत ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अश्या सर्व राजकीय पक्षांचे, नेतेमंडळींचे आभार व्यक्त केले जात आहेत.