लंडनहून आलेल्या ७० वर्षीय नराधमाने १० वर्षीय बालिकेवर दोन वर्षे केले लैंगिक अत्याचार; पैशांच्या मोहात आईनेच विकली माया !

Rape2
पनवेल | 
तळोजा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाने भारतात येऊन अवघ्या दहा वर्षांच्या बालिकेवर तब्बल दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलीचीच आई आरोपीला मदत करत होती, हे तपासात स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणाचा पर्दाफाश करत आरोपी फारुक अल्लाउद्दीन शेख (वय ७०, रा. पाँडेचेरी, सध्या लंडन) तसेच पीडितेची आई यांना अटक केली आहे. फारुक शेखने दोन वर्षांपूर्वी तळोजा सेक्टर-२० मधील फ्लॅट विकत घेतला होता. तो दोन-तीन महिन्यांनी भारतात काही दिवसांसाठी येत असे. या काळात त्याची ओळख पीडित मुलीच्या आईसोबत झाली. घरकामाच्या बहाण्याने ती आपल्या दहा वर्षांच्या मुलीला फारुकच्या घरी सोडत असे. आरोपी मुलीला मद्य पाजून, धमक्या देऊन अमानुष अत्याचार करत असे. तपासादरम्यान उघड झाले की, आईनेच फारुककडून अडीच लाख रुपये आणि दर महिन्याचे रेशन घेऊन आपल्या मुलीला त्याच्याकडे पाठवले. पैशांच्या मोहापोटी मायेचा गळा घोटणाऱ्या या आईच्या निर्दयी कृत्याने पोलीस अधिकारीदेखील स्तब्ध झाले आहेत.
पोलिसांनी आरोपीच्या फ्लॅटवरून दारूच्या बाटल्या, सेक्स पॉवरच्या गोळ्या, सेक्स टॉय, डिजीटल रेकॉर्डर, डीव्हीआर आणि अन्य संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. या घटनेने तळोजा आणि संपूर्ण पनवेल परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फारुक अल्लाउद्दीन शेख आणि पीडितेची आई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *