रुद्रोली गावातील सुरेखा निकम यांना वाळीत टाकल्याच्या कथित प्रकरणाला माणगांव पोलिसांच्या संवेदनशील पुढाकारामुळे सकारात्मक वळण मिळाले आहे. पोलीस निरीक्षक मारुती विठाबाई शंकर आंधळे (पीआय आंधळे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केवळ तक्रारीची दखल न घेता प्रत्यक्ष गावात जाऊन संवादातून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच पाण्याची अडचण लक्षात घेऊन दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण करत सुरेखा निकम यांना ३०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी रुद्रोली येथील मंदिरात गावकरी आणि निकम कुटुंबीयांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत संवादातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, संबंधित महिलेचा पाण्याचा ड्रम फुटल्याने निर्माण झालेल्या अडचणीची पोलिसांनी दखल घेत ३०० लिटरची पाण्याची टाकी देण्याचे आश्वासन दिले होते.
माणगांव पोलिसांनी दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण केले. एएसआय सचिन निमकर, पोलीस कॉन्स्टेबल वामन, गावकरी तसेच निकम कुटुंबीयांच्या उपस्थितीत पाण्याची टाकी सुरेखा निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीचा दिलासा मिळाला आहे.
सुरेखा निकम यांनी सामाजिक गैरसमजुती तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित अडचणींबाबत माणगाव पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रत्यक्ष गावात जाऊन बैठक घेतली. संवाद, समन्वय आणि सामंजस्याच्या माध्यमातून परिस्थिती निवळविण्याचा प्रयत्न करण्यासोबतच पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या प्रश्नावर मानवी दृष्टिकोनातून मदतीचा हात दिला.
पीआय आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दिलेले आश्वासन केवळ कागदोपत्री किंवा शब्दांपुरते न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच एखाद्या नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत अडचणीची संवेदनशीलतेने दखल घेऊन मदत करण्याची भूमिका पोलिसांनी या घटनेतून दाखवून दिली आहे.
रुद्रोलीतील कथित वाळीत टाकण्याच्या प्रकरणाला संवादातून पूर्णविराम देण्याच्या प्रयत्नांना आता प्रत्यक्ष मदतीची जोड मिळाली आहे. पोलिसांचे आश्वासन केवळ शब्द नव्हे, तर ते कृतीतूनही सिद्ध होऊ शकते, याचा सकारात्मक संदेश या घटनेतून मिळाला असून, पीआय आंधळे यांच्या संवेदनशील भूमिकेचे आणि माणगांव पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण उपक्रमाचे कौतुक होत आहे.