कोलाड परिसरात रेल्वे अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू

कोलाड | श्याम लोखंडे

कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील गोवे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
प्राप्त महितीनुसार, सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.२६ वाजण्याच्या सुमारास मौजे गोवे गावाच्या हद्दीत गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे मार्गावर एक अनोळखी इसम पडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा इसम मृतावस्थेत आढळून आला. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचा वर्ण सावळा असून त्याने काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती.
या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात मृत्यू र.जि. क्र. १३/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, प्राथमिक नोंदीनुसार मृत्यूचे कारण रेल्वे अपघात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. एस. नागे पुढील तपास करीत आहेत.