गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २.०’मध्ये हृदयविकाराचे लवकर निदान आणि वेळेत उपचार मिळण्यावर विशेष भर देण्यात आला. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान १२ दिवस चाललेल्या या अभियानात तब्बल ७,४२३ नागरिकांची ECG तपासणी करण्यात आली. तपासणीत गंभीर स्थिती अथवा पुढील तपासणीची आवश्यकता आढळलेल्या ४६२ रुग्णांना अँजिओग्राफी तसेच पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आले.
या अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण १,२७४ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमधून ५४,१५२ नागरिकांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. यामध्ये २५,४९४ पुरुष, २४,२९० महिला आणि ४,५९६ बालकांचा समावेश आहे.
हृदयविकारासोबतच विविध आजारांच्या तपासणीसाठी विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. मेडिसिन विभागात सर्वाधिक २४,८१५ नागरिकांची तपासणी करण्यात आली. नेत्ररोग विभागात १,६३३, अस्थीविकार १,३१७, स्त्रीरोग १,०८२, शल्यचिकित्सा ९५९, त्वचारोग ८६८, हृदयरोग ७५२, बालरोग ५८५ आणि कान-नाक-घसा विभागात ३९२ नागरिकांची तपासणी झाली.
अभियानात केवळ उपचारांवर भर न देता प्रतिबंधात्मक आणि डिजिटल आरोग्यसेवेलाही प्राधान्य देण्यात आले. १,५६१ नागरिकांची ABHA नोंदणी करण्यात आली, तर १,६३३ नागरिकांना गोल्डन कार्ड मिळाले. याशिवाय ३२७ रक्ततपासण्या करण्यात आल्या.
सामाजिक आरोग्य सहभागातून २४२ नागरिकांनी रक्तदान केले, तर २२ नागरिकांनी अवयवदानासाठी संमती दिली. त्यामुळे आरोग्य तपासणीसोबतच रक्तदान आणि अवयवदानाबाबतही जनजागृती करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात राबविण्यात आलेल्या या अभियानातून मोठ्या संख्येने नागरिकांची आरोग्य तपासणी झाली. विशेषतः ECG तपासण्यांमधून संभाव्य हृदयविकाराच्या रुग्णांची वेळीच ओळख करून त्यांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘आरोग्यदायी नागरिक सशक्त रायगड’ या संकल्पनेतून अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.