बाल लैंगिक शोषणाच्या आक्षेपार्ह सामग्रीविरोधात रायगड पोलिसांची धडक कारवाई; सहा आरोपीमध्ये सर्वात लहान पाच वर्षाचा

रायगड | अमूलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत असणाऱ्या अठ्ठावीस पैकी पाच पोलीस ठाण्यात इंटरनेट व सोशल मीडियाचा वाढता वापर लक्षात घेता, त्याचा गैरवापर करून लहान मुला-मुलीने लैंगिक शोषण दर्शविणारे व्हिडिओ व छायाचित्रे तयार करणे, रवत जवळ ठेवणे, इंटरनेट व सोशल मीडिया परफॉर्मवर अपलोड करणे, त्यांचे प्रसारण करणे अथवा अशा सामग्रीत शेत्साहन देणा-या ऑनलाईन कृती करणे, ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकाराविरुद्ध रायगड पोलिसांकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. करण्यात आलेल्या पाच कारवाईत सहा आरोपी असून यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन असून सर्वात लहान वयाचा आरोपी हा पाच वर्षाचा आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या प्रसिद्धी पत्रकमधून झाली आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून बाल लैंगिक शोषणासंदर्भातील आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रांचे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध रायगड पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. रायगड पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंगदरम्यान अशा प्रकारची सामग्री प्रसारित करणारे युजर निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे सोशल मीडियावर अशा आक्षेपार्ह सामग्रीचा प्रसार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांच्या नेतृत्वाखाली सायबर पथकाकडून इंटरनेट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नियमितपणे सायबर पेट्रोलिंग करण्यात येत आहे. या दरम्यान बाल लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडिओ व छायाचित्रांची देवाणघेवाण करणाऱ्या प्रोफाइलची माहिती पोलिसांना मिळाली.
प्राप्त अहवालांचे अवलोकन करून संबंधित प्रोफाइल आयडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी बाल लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडिओ तयार करून ते स्वतःजवळ बाळगणे, तसेच इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून इतर युजर्सना प्रसारित केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले.
रेवदंडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३३/२०२६, मुरूड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३७/२०२६, खोपोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३३७/२०२६, खालापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२०/२०२६ आणि दादर सागरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३/२०२६ असे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांत भारतीय न्याय संहितेतील कलम २९४, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमातील कलम १४ व १५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६७(बी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या पाचही गुन्ह्यांतील आरोपींचे वय अनुक्रमे १६.५, १९, २८, २४ आणि २५ वर्षे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित प्रकरणांचा पुढील तपास पोलीस पथकांकडून सुरू आहे.
दरम्यान, इंटरनेट किंवा सोशल मीडियावर बाल लैंगिक शोषणासंदर्भातील आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा छायाचित्रे आढळल्यास ती पुढे पाठवू नयेत, डाउनलोड करू नयेत, स्वतःजवळ साठवू नयेत किंवा कोणत्याही माध्यमातून प्रसारित करू नयेत, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे. अशा सामग्रीचे शेअरिंग अथवा प्रसारण केल्यास संबंधित व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
पालकांनीही आपल्या पाल्यांच्या मोबाईल आणि सोशल मीडिया वापरावर विशेष लक्ष ठेवावे, तसेच ऑनलाइन माध्यमातून कोणतेही बेकायदेशीर कृत्य होत नाही ना, याबाबत सतर्क राहावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. बालकांचे संरक्षण ही समाजातील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे.