रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला असून, सध्या जागा वाटपासंदर्भात आघाडीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. या संदर्भातील माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली.
शनिवारी अलिबाग येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसाद भोईर यांनी सांगितले की, “रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतील. सध्या जागा वाटपाबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे आणि एकमताने निर्णय घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.”
या पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, सतीश पाटील, तनुजा पेरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भोईर म्हणाले, “आघाडीच्या माध्यमातूनच सत्ता काबीज करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र काही ठिकाणी आघाडी शक्य नसल्यास शिवसेना स्वबळावरही लढण्यासाठी सज्ज आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना दूर ठेवले जाईल आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल.”
अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठीही पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. येथे नऊ ते दहा इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी दाखवली आहे. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षासोबत (शेकाप) चर्चा सुरू असून, सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला. “अलिबागमध्ये आम्ही तीन ते चार जागांसाठी आग्रही आहोत,” असेही ते म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये आगामी काळात आघाडीच्या माध्यमातून लढण्याच्या निर्णयामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची एकत्रित ताकद स्थानिक पातळीवर कितपत परिणाम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पुढाकारामुळे रायगडमधील आगामी नगरपालिका निवडणुका अत्यंत रंगतदार आणि ऐतिहासिक ठरणार आहेत.