राज्यात सुरू असलेल्या २९ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानापूर्वीच ६० हून अधिक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार सत्ताधारी महायुतीतील असून त्यात सर्वाधिक भाजपचे, तर त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. या बिनविरोध निवडींमागे पैशाची आमिषे, दबाव आणि दहशतीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे.
या प्रकरणाविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत, त्या निवडणुकांना स्थगिती द्यावी आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत ती कायम ठेवावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना उद्या, १४ जानेवारी रोजी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.
मनसेच्या वतीने वकील असीम सरोदे यांनी याचिकेतील मुद्दे मांडताना सांगितले की, राज्यात यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका झालेल्या नाहीत. ३ ते ६ कोटी रुपयांची आमिषे दाखवून विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आल्याच्या चर्चा असून ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच, एकच उमेदवार असला तरी ‘नोटा’सह मतदानाचा हक्क मतदारांना द्यावा आणि बिनविरोध निवडणुकांसाठी किमान मतदान टक्क्याची तरतूद कायद्यात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याने आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.