महाड शहरात ३ वर्षात ९६३ कुत्र्यांच्या नसबंदीवर १३ लक्ष रुपये खर्चून देखील कुत्र्यांची संख्या वाढली!

महाड | मिलिंद माने 
महाड शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या नसबंदी मोहिमेचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र समोर आले आहे. मागील तीन वर्षांत तब्बल १३ लाख ६९ हजार २०० रुपये खर्च करूनही केवळ ९६३ कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाड नगर परिषदेमार्फत सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात करुणा वाईल्ड लाईफ असोसिएशन आणि वन्यजीव अभ्यासक डॉ. सोपान जगताप यांच्या माध्यमातून नसबंदी मोहीम राबविण्यात आली. मात्र कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता ही मोहीम अपुरी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात अनेक ठिकाणी सकाळच्या वेळेत मोकाट कुत्र्यांना बिस्किटे व खाद्यपदार्थ देण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे कुत्र्यांची संख्या अधिक वाढत असल्याची चर्चा आहे. याशिवाय मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून लहान मुले आणि वृद्धांवर हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत.
दरम्यान, कुत्रा चावल्यानंतर शासकीय रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयात खर्चिक उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून नगरपालिकेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.