महाड औद्योगिक वसाहतीतील प्रतिष्ठित सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास क्लोरीन वायूची गळती झाल्याची घटना घडली. अचानक झालेल्या या वायू गळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कंपनीतील सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र या वायू गळतीत नेमके किती कामगार बाधित किंवा जखमी झाले आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेमुळे महाड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्यांमध्ये वारंवार वायू गळतीच्या घटना घडत असताना औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फॅक्टरी इन्स्पेक्टरकडून केवळ औपचारिक भेटी दिल्या जात असल्याचा आरोप कामगारांकडून होत असून, ठोस उपाययोजना न झाल्यास अशा घटना भविष्यातही घडत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.