डोंगरदऱ्यांतून कुडपण गावातील निसर्गसौंदर्य पाहात आलो तेव्हा शाकाहारी विठ्ठलभक्तांच्या या गावाचा कायापालट करण्यासाठी गांव दत्तक घेणार असल्याचा मनोदय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर तथा ‘ठाणावाला’ यांनी व्यक्त केला. कुडपण गावाचे ऐतिहासिक आध्यात्मिक तसेच पर्यटनदृष्टया महत्व लक्षात घेता उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ‘प्रति रायगड’ पर्यटनासाठी कुडपण विकासाचा ‘पण’ केल्याचा ठाम निर्धार राज्याचे रोहयो, खारजमीन आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.
कुडपण बुद्रुक येथे श्रीकाळकाई, वाघजाई, मानाई देवी आणि श्रीहनुमान मंदिराच्या प्रांगणातील अलिशान मंडपामध्ये आयोजित सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी उद्योजक राहुल पवार, भाजप मुंबई महामंत्री सागर पवार, कुडपण सरपंच अविनाश चिकणे, पुणे ग्रामस्थ समिती अध्यक्ष पांडूरंग चिकणे, मुंबईतील अशोक चिकणे, शंकर चिकणे, जावजीबुवा चिकणे तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत उद्योजक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर तथा ‘ठाणावाला’ यांचा पुणेरी पगडी, उपरणे आणि ज्ञानेश्वरीग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, नानजीभाईंनी कुडपण गावांतील मंदिरे आणि भिमाची काठी येथील पर्यटन विकासाची सद्यस्थितीची पाहाणी केली. भिमाच्या काठी सुळक्यावर शंकर आणि मारूतीच्या विराट मुर्ती बसविण्याची ग्वाही नानजीभाईंनी दिली.
दुपारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण अध्यक्ष आणि पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांचा तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संतोष मोरे, शिवाजी साळवी तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा उपरणे आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पत्रकार पालकर यांनी, पत्रकार आणि ग्रामस्थांच्या पाठपुरावा व प्रयत्नांतून सामाजिक, राजकीय व्यक्ती तसेच लोकप्रतिनिधींना जनतेच्या गैरसोयी व गरजांची माहिती होऊन विकासाला चालना मिळत असल्याचा अनुभव कुडपणच्या टप्प्या टप्प्याने होणाऱ्या विकासामुळे आला असून सुवर्णमहोत्सवी हरिनाम सप्ताहात नानजीभाई खिमजीभाई ठक्कर तथा ‘ठाणावाला’ यांनी गाव दत्तक घेतल्यामुळे कुडपणच्या विकासाचे सुवर्णयुग सुरू होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. यावेळी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संतोष मोरे यांनी सप्ताहकाळात कुडपणमध्ये आरोग्य सेवा देत असल्याची माहिती दिली.
पाच वर्षांनी एक मत मागतो आणि दुप्पटीने देतो-मंत्री गोगावले यांचे आवाहन
मिनी महाबळेश्वर कुडपण बुद्रुक व कुडपण खुर्द परिसरामध्ये ‘प्रति रायगड’ साकारण्यासाठी शिवछत्रपतींचा मेघडंबरीचा पुतळा तसेच पहिल्या कुडपणमधील काळकाई व तिसऱ्या कुडपणमधील भराडीदेवीचे मंदिर पर्यटन विकासातून विशेष निधीची उपलब्धता देणार असून एका वर्षात सातारा जिल्हा हद्दीचा कोंडूशी गावापर्यंतचा रस्ता 3 किमीपर्यंत पूर्ण झाला असून पुढील कामासाठी आवश्यक निधी 4-5 कोटींची उपलब्धता करून देईपर्यंत काम सुरूच राहणार आहे. पोलादपूरपासून कुडपणपर्यंत येण्याचा रस्ता पुन्हा करणार आहे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांसोबत मुसलमान होते तसा आमच्या सोबत जमीर धामणकर हा कॉन्ट्रॅक्टर आहे. तो काम निष्ठेने पूर्ण करतोय, असे गौरवोदगार मंत्री भरतशेठ गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी मंत्री गोगावले यांनी आम्ही कुडपणसाठी काही केले असेल तरच आम्हाला जसा आशीर्वाद दिला तसा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारांनाही द्या, असे आवाहन केले.
याप्रसंगी व्यासपिठावर श्रीगणेशनाथ महाराज संस्थानचे तपोनिधी स्वानंद सुखनिवासी अरविंदनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, संपर्कप्रमुख किशोर पवार, विभागप्रमुख सतीश शिंदे, विजय शेलार, अनिल दळवी, अविनाश शिंदे, प्रभाकर पवार, हनुमंत शेलार, वसंत शेलार, नारायण साने, उद्योजक रामदास कळंबे, रस्त्याच्या कामाचे ठेकेदार सह्याद्री कन्स्ट्रक्शन्सचे जमीर धामणकर तसेच अन्य पदाधिकारी मान्यवर होते.
यावेळी राजिपचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी कुडपणच्या विकासाची संकल्पना आधी प्रभाकर मोरे, नंतर माणिक जगताप आणि आता मंत्री गोगावले यांच्याकडून पुढे नेली जात असून विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंत्री भरतशेठ यांच्यामुळे सर्वाधिक निधी उपलब्ध झाला असल्याचा दावा केला.
येत्या 1 जानेवारी 2026 पर्यंत होणाऱ्या या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मधल्या कुडपणमध्ये विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच साधारणपणे 25 ते 25 हजार वारकरी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा सुनील चिकणे, तुषार चिकणे, विष्णू चिकणे, नरेश चिकणे, विशाल चिकणे, लहू चिकणे, आनंद चिकणे तसेच कुडपण बुद्रुक ग्रामस्थ मंडळ व केबीआर युवा मंडळाने व्यक्त केली आहे.