
महाड | मिलिंद माने
रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीतील सर्व रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून, खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न येथे येणाऱ्या-जाणाऱ्या कामगार व वाहनचालकांना पडत आहे. धुळीचे साम्राज्य इतके वाढले आहे की काही ठिकाणी रस्ताच दिसेनासा होत आहे. दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणेही कठीण झाले असून आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
महाड एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. एवढेच नव्हे, तर वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचीही स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अवजड वाहनांच्या मोठ्या वर्दळीमुळे खड्ड्यांचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, हे खड्डे भरून काढण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) मात्र दुरुस्तीची हालचाल अद्याप सुरू केलेली नाही.
अंतर्गत रस्त्यांवरील धुळीमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली असून, कामगार वर्ग व वाहनचालक यातून सर्वाधिक त्रस्त आहेत. इतक्या गंभीर परिस्थितीतही एमआयडीसीच्या प्रदूषण विभागाचे अधिकारी गप्प का आहेत, असा सवाल कामगारांपासून उद्योग परिसरातील नागरिकांपर्यंत सर्वत्र उपस्थित केला जात आहे. खड्डे, धूळ आणि प्रदूषणाच्या समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.