नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील लव्हाळी वाडी परिसरात ज्येष्ठ मराठी दांपत्य संजय आणि संजना सावंत यांच्या ‘माथेरान व्हॅली’ या बंगल्यावर परप्रांतीय भाडेकरू हेमंद्र कुमार प्रसाद श्रीवास्तव यांनी कब्जा केला होता. ११ महिन्यांचा करार संपल्यानंतरही श्रीवास्तव यांनी बंगला रिकामा करण्यास नकार देत दोन महिन्यांचं भाडं थकवलं आणि सावंत दांपत्याला घरात पाऊल ठेवू दिलं नाही. ज्येष्ठ दांपत्य आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याकडे धाव घेतली.
मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सचिव अक्षय महाले, तालुकाध्यक्ष यशवंत भवारे, उपतालुकाध्यक्ष प्रवीण राणे, विद्यार्थी सेना अध्यक्ष करण खडे, महिला शहराध्यक्षा तेजश्री भोईर आणि कार्यकर्त्यांनी नेरळ येथे दाखल होत पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई केली. परप्रांतीय ‘प्रोफेसर’ पोलिसांच्या आडोशाला जाण्याचा प्रयत्न करत असतानाच, प्रशासनाने घर रिकामं करण्याचा आदेश दिला आणि अखेर २४ तासांत श्रीवास्तव यांनी बंगला सोडला. सावंत दांपत्याच्या हाती घराच्या चाव्या सुपूर्द होताच मराठी आत्मसन्मानाचा विजय झाला.
या घटनेनंतर नेरळ परिसरात मनसेच्या ठाम भूमिकेची चर्चा रंगली आहे. मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मराठी माणसाला फसवण्याचे धाडस कोणी केल्यास, त्याला मनसे-स्टाईलमध्येच धडा शिकवला जाईल.”