मराठी भाषा विभागाची सात संकेतस्थळे आता नव्या डोमेनवर; MahaIT मार्फत हस्तांतरण पूर्ण

 मुंबई | प्रतिनिधी  
 महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधीनस्थ चार प्रमुख कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahaIT मार्फत हस्तांतरण आणि अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार (maharashtra.gov.in) ही सर्व संकेतस्थळे आता नव्या डोमेनवर कार्यान्वित करण्यात आली असून नागरिक, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी ती पुन्हा उपलब्ध झाली आहेत.
हस्तांतरणाच्या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक प्रणालीगत बदल करण्यात येत असल्याने ही संकेतस्थळे काही काळासाठी तात्पुरती अनुपलब्ध होती. आता ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर मराठी भाषा विभागाचे संकेतस्थळ marathi.maharashtra.gov.in, भाषा संचालनालयाचे directorate-marathi.maharashtra.gov.in, राज्य मराठी विकास संस्थेचे rmvs-marathi.maharashtra.gov.in, तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे sahitya-marathi.maharashtra.gov.in या नव्या पत्त्यांवर सुरू झाले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे marathivishwakosh.maharashtra.gov.in, विश्वकोश प्रथमावृत्तीसाठी vishwakosh-marathi.maharashtra.gov.in आणि मराठी परिभाषा कोशासाठी shabdakosh-marathi.maharashtra.gov.in ही संकेतस्थळे उपलब्ध करण्यात आली आहेत. नागरिक, अभ्यासक, साहित्यिक, शोधार्थी, विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नव्या संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.