कर्जत तालुक्यातील भिवपूरी टाटा पॉवर पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम जोमात सुरू असून, कठीण दगड फोडण्यासाठी कंपनीने ब्लास्टिंग परवानगीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. यासंदर्भातील प्रसिद्ध झालेल्या नोटीसीवर ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या आहेत.
भिवपूरी टाटा कॅम्प येथील गट नं. १ मध्ये ब्लास्टिंग करून कठीण दगड फोडण्याचे काम मे साल्नो एक्स्प्लोसिव व केमिकल्स प्रा. लि., सिकंदराबाद तेलंगणा कंपनीमार्फत केले जात आहे. या कामासाठी दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी परवानगीची मागणी करण्यात आली होती. त्यावर ७ मे २०२५ रोजी तहसीलदार कार्यालयाने विस्फोटक नियम २००८ मधील नियम १०३ (३) नुसार ग्रामस्थांच्या हरकती मागवण्यासाठी जाहिर नोटीस दिली होती.
या नोटीसीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत, ग्रामस्थ, आदिवासी समन्वय समिती कर्जत व आदिवासी महादेव कोळी समाजोन्नती मंडळ कर्जत यांच्या वतीने कर्जत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ब्लास्टिंग परवानगी दिल्यास जमिनीला होणारे भू-प्रदूषण, सुपीक जमिनी नापीक होणे, जमिनीखालील पाण्याचे स्रोत बंद होणे, जमीन क्षारयुक्त होणे, भावी पिढ्यांचे भवितव्य धोक्यात येणे यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
त्याचबरोबर या समस्यांकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास अमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी हेमंत नवले, शिवाजी दिसले, हरिश्चंद्र निसाळ (उपसरपंच), गणेश ढाकवळ, अनिल पढार, दत्ता नवले, विजय लोहर, दिनेश ढाकवळ, तानाजी तुरडे, सुयोग तापकिर, महेंद्र गाडे, अक्षय गारे, कृष्णा कावळे, विराज तुपे, विनोद दिसले, प्रसाद लोहर, विशाल लोहर आदि उपस्थीत होते.